जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चटई कंपनीत काम करणाऱ्या ठेकेदाराने वडील आजारी आहे. असे सांगून कंपनीचे मालक सुनिल बाबुलाल सोनवणे (वय ४५, रा. वाघनगर) यांच्याकडून एक लाख रुपये आणि त्यांची कार घेवून मध्यप्रदेशात घेवून गेला होता. चार महिने झाले तरी तो कार आणि पैसे परत करण्यास टाळाटाळ करीत असल्याने सोनवणे यांना आपली फसवणुक झाल्याची खात्री झाली. त्यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार संशयित प्रमोद नानटेक कामत (मूळ रा. दरभंगा, बिहार, ह. मु. साईिसटी, कुसुंबा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील वाघ नगरात राहणारे सुनिल सोनवणे यांची एमआयडीसीमध्ये चटईची कंपनी आहे. याठिकाणी दहा ते बारा मजूर काम करतात. दरम्यान, दोन वर्षांपासून प्रमोद कामत या परप्रांतीय ठेकेदाराने मजूर पाठविले होते. तसेच ठरल्याप्रमाणे सोनवणे हे कामतकडे मजूरांची मजूरी देवून तो मजूरांना वाटप करीत होता. सोनवणे हे प्रमोद कामतला कंपनीचे इतर कामे देखील सांगत असल्यामुळे त्यांच्यावर अत्यंत विश्वास बसला होता. तसेच मजूरीचे पैसे देखील तो व्यवस्थीत वाटत असल्याने कामगारांनी देखील कधीही त्याच्याबाबत तक्रार केलेली नव्हती. त्यानंतर प्रमोद कामत याने दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी सुनिल सोनवणे यांना फोन करुन सांगीतले की, त्याचे वडील मध्यप्रदेशात त्याच्या नातेवाईकांकडे आलेले होते.
त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे मला तुमची कार व दवाखान्याच्या खर्चासाठी काही पैसे अगाऊ द्या असे सांगितले. त्यानुसार सोनवणे यांनी त्यांची (एमएच ०४, ईएच ७४२८) क्रमांकाची कार आणि एक लाख रुपये दिले होते. सोनवणे हे कामत याला वारंवार फोन करीत असल्यामुळे त्याने मला आता कामावर येणे शक्य होणार नाही असे सांगितले. तसेच तो प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे देत असल्याने सोनवणे यांना आपली फसवणुक झाल्याची खात्री झाली. त्यांनी शनिवार दि. १८ रोजी रामानंद नगर पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार ठेकेदार प्रमोद कामत याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.