अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ भीषण अपघात झाला असून, यामध्ये मारवड (ता. अमळनेर) येथील पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. पियुष गणेश सोनवणे (वय-34) आणि वृंदा पाटील या दाम्पत्याचा या अपघातात मृत्यू झाला. अपघातामध्ये पाच वाहनांचा समावेश होता, ज्यात कंटेनर, ट्रक, व खाजगी बसचा समावेश आहे. या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले असून, गावावर शोककळा पसरली आहे.
अपघात बुधवारी १५ जानेवारी रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास शहापूरजवळ झाला. पियुष व वृंदा मकरसंक्रांतीनिमित्त घरी आले होते व रात्री खाजगी ट्रॅव्हल्सने मुंबईकडे परत निघाले होते. मात्र, त्यांचे हे मुंबईला परत जाणे त्यांच्या आयुष्याचे शेवटचे ठरले.
पियुष मुंबई महानगरपालिकेत नोकरीला होता, तर वृंदा उच्चशिक्षित असून माहेर असलेल्या बोरगाव येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होती. अपघातात त्यांची अडीच वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे व तिच्यावर उपचार सुरू आहेत. पियुष हे मारवड माध्यमिक शाळेचे निवृत्त क्लर्क भाऊराव सोनवणे यांचे पुतणे होते. त्यांच्या दुर्दैवी निधनाने मारवड गावात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, प्रशासनाने या घटनेची दखल घेतली आहे.