यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील १९७५ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल ५० वर्षांनंतर स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येत बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमात 28 विद्यार्थी आणि 7 विद्यार्थिनी सहकुटुंब सहभागी झाले. सोहळ्याला त्या वेळचे 4 गुरुजन आणि 3 कर्मचारी हजर राहिले. याशिवाय शाळेचे विद्यमान प्राचार्य डी. व्ही. चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ माता आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. अध्यक्षस्थानी येल ए. चौधरी होते. सूत्रसंचालन शिरीष चौधरी यांनी केले तर प्रास्ताविक पंडित जावळे यांनी केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी, यशस्वी व्यावसायिक जीवनातील अनुभव आणि कौटुंबिक आनंदाचे क्षण एकमेकांशी शेअर करत जुने दिवस पुन्हा अनुभवले. अनेकांचे डोळे पाणावले, आणि हृदय nostalgic भावनांनी भरून आले. शिक्षकांनीही जुन्या विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या प्रगतीबद्दल भरभरून कौतुक केले. गुरुजनांनी आपल्या मनोगतात, “शालेय जीवनातील क्षण मोत्यासारखे असतात. ते आयुष्यभर जपून ठेवा. शाळेच्या संपर्कात राहा, भेटा, बोला. ही शाळा नेहमीच तुमची राहणार आहे,” असे भावस्पर्शी विचार व्यक्त केले. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या डॉक्टर, शिक्षक, उद्योगपती, आणि विविध क्षेत्रातील यशाबद्दल अभिमान व्यक्त केला.
कार्यक्रमानंतर सर्व सहभागीनी शेतात वनभोजनाचा आनंद घेतला. हा आनंदसोहळा अनुभवताना एकमेकांना पुन्हा अशाच प्रकारच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्याचे ठरवून निरोप घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डी. व्ही. चौधरी आणि शाळेतील कर्मचाऱ्यांनी महत्त्वाचे सहकार्य केले.