जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने “सामूहिक सूर्यनमस्कार” आणि राष्ट्रीय योगासन स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या योग शिक्षिका डॉ. शरयु विसपुते यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम मंगळवारी १४ जानेवारी रोजी सकाळी ७.१५ वाजता सिद्धार्थ लॉन, मेहरूण तलाव परिसर येथे होणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.१५ वाजता सामूहिक सूर्यनमस्काराने होईल, त्यानंतर ७.३० वाजता प्राणायाम साधनेचे आयोजन आहे. सकाळी ८ वाजता आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते डॉ. शरयु विसपुते यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सत्कार समारंभानंतर, महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या १२ सूत्री मागण्यांचे पत्र कार्यकारिणी सदस्यांच्या हस्ते आमदार साहेबांना सादर केले जाईल. त्यानंतर चहा व नास्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. योग शिक्षक संघाने सर्व योग शिक्षक व साधकांना या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचे आवाहन केले आहे. सामूहिक सूर्यनमस्कार व प्राणायाम साधनेद्वारे योगप्रेमींना आरोग्य व सुदृढतेचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल गुराव यांच्यासह कार्यकारिणी सदस्य विशेष परिश्रम घेत आहे. योगप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.