जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दीपनगर येथील नवीन ६६० मेगावॅट प्रकल्पात दोन दिवसांपूर्वी झालेल्या जबरी चोरी प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. चोरी झालेला मुद्देमाल आणि त्याची किंमत अजूनही स्पष्ट नाही, त्यामुळे या प्रकरणावर शंका निर्माण झाली आहे.
ही चोरी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) कंपनीच्या देखरेखीखाली काम करणाऱ्या के.एस.एल. कंपनीच्या स्टोअरमधून झालेली आहे. दोन दिवसांपासून पोलीस प्रशासन या प्रकरणाचा तपास करत असून, के.एस.एल. कंपनीकडून चोरी झालेल्या मुद्देमालाची माहिती अद्याप गोळा केली जात आहे. लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने के.एस.एल. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी चोरीच्या तक्रारीसाठी अद्याप माहिती संकलित केली जात असल्याचे सांगिण्यात आले, मात्र, बीएचईएलच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, चोरीस गेलेला माल हा के.एस.एल. कंपनीच्या ताब्यात होता, त्यामुळे गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामुळे नवीन प्रकल्प कार्यान्वित होण्यात उशीर होण्याची शक्यता आहे. संबंधित मुद्देमालाची किंमत आणि तपशील लवकरच उघड होईल अशी अपेक्षा आहे. लाईव्ह ट्रेंड्स न्यूज लवकर नवीन प्रकल्पातील कोळसा चोरीबाबत भांडाफोड करणार आहे. या घटनेनंतर महाजेनको प्रशासन कठोर कारवाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चोरीस गेलेल्या मालाचा तपशील देण्यास के.एस.एल. कंपनी अपयशी ठरत असल्याने संशय निर्माण झाला आहे. चोरीमुळे प्रकल्पाच्या वेळापत्रकावर परिणाम होईल का, यावरही प्रश्नचिन्ह आहे.