कापड विक्रेत्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील काँग्रेस भवनाजवळील जैन मंदिर परिसरात हातगाडीवर कपडे विकणाऱ्या दोन गटांमध्ये ग्राहकाला बोलावण्याच्या कारणावरून शनिवारी तुफान हाणामारी झाली. दुपारी १ वाजता घडलेल्या या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांना दगड आणि लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरातील काँग्रेस भवनाजवळ काही हातगाडी विक्रेत्यांनी अतिक्रमण करून कपड्यांचे व्यवसाय सुरू केले आहेत. शनिवारी ११ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता ग्राहक कपडे खरेदीसाठी आले असताना, अशोक रमेश माळी (४९, रा. शनीपेठ) हे ग्राहकांना कपडे दाखवत होते. त्याच वेळी शेजारील विक्रेता सतीष चंद्रप्रकाश भैरवानी यांनी ग्राहकाला आवाज देऊन आपल्या गाडीकडे बोलावले. यावरून अशोक माळी यांनी जाब विचारला, आणि वादाला सुरुवात झाली.

वाद विकोपाला जाताच दोन्ही विक्रेत्यांनी आपापल्या नातेवाईकांना आणि परिचितांना बोलावून घेतले. यानंतर अशोक माळी, त्यांचे सहकारी आणि बहिण, तसेच सतीष भैरवानी, त्यांचा भाचा गणेश उर्फ गोलू भावसार, चंद्रप्रकाश भैरव, आणि रिचा निलेश लोहार यांच्यात जोरदार हाणामारी झाली. हाणामारीदरम्यान रस्त्यावर दगडफेक आणि लाकडी काठ्यांचा वापर करण्यात आला. या घटनेबाबत सायंकाळी ६ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्ह्यांची नोंद झाली. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या असून पुढील तपास पोहेकॉ प्रकाश पाटील आणि सहाय्यक फौजदार संगिता खंडारे करत आहेत.

Protected Content