वर्ष २०२४ ठरलं आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वर्ष 2024 हे आत्ता पर्यंतचे नोंदवण्यात आलेले सर्वांत उष्ण वर्ष ठरले आहे. सलग बारा महिने सरासरीपेक्षा जास्त तापमान राहिले. त्यामुळे नजीकच्या काळात मोठ्या विध्वंसक बदलाची चाहूल दाखवली आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग हळूहळू गरम होत आहे. हे आजपर्यंतच्या हवामान बदलातून दिसून आले. मात्र, हाती आलेल्या ताज्या अहवालानुसार 2024 च्या हवामान बदलाची आकडेवारी ही चिंताजनक आहे.

हवामानावर काम करणारी एजन्सी कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसने एका अहवालात म्हटले आहे की, हे पहिलेच वर्ष आहे ज्यामध्ये सरासरी जागतिक तापमान 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहिले. कोपर्निकसक्लायमेट चेंज सर्व्हिसची ही घोषणा हवामान बदलाच्या वाढत्या परिणामांबद्दल सतर्क राहण्याचा इशारा देते.

कोपर्निकसच्या ताज्या अहवालानुसार, 2024 मध्ये अति उष्णता, भयावह पूरस्थिती, दुष्काळ आणि वणव्याच्या घटनांमध्ये वाढ होईल. उदाहरणार्थ, लॉस अँजलीस, कॅनडा आणि बोलिव्हियामधील जंगलातील आगींनी विक्रम मोडले आहेत. त्याच वेळी, उच्च तापमान आणि आर्द्रतेमुळे तीव्र उष्णतेच्या परिस्थितीत वाढ झाली. २०२४ चे सरासरी जागतिक तापमान 15.1 अंश सेल्सिअस होते. जे 1991-2020 च्या सरासरीपेक्षा 0.72 अंश जास्त होते. तर, 2023 च्या सरासरीपेक्षा 0.12 अंश जास्त होते. शास्त्रज्ञांना असे आढळून आले की 2024 मध्ये सरासरी तापमान 1850-1900 च्या बेसलाइनपेक्षा 1.6 अंश सेल्सिअस जास्त ठरले.

संपूर्ण वर्षात सरासरी जागतिक तापमान 1850-1900 च्या सरासरीपेक्षा 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. कोपर्निकस शास्त्रज्ञांच्या मते, या वाढीचे परिणाम जागतिक हवामान आणि परिसंस्थांवर दीर्घकाळ जाणवतील. 2023 च्या तुलनेत कार्बन डायऑक्साइडची पातळी 2.9 भाग प्रति दशलक्ष (ppm) जास्त होती. जी 422 पीपीएमवर पोहोचली. तर मिथेनची पातळी 3 भाग प्रति अब्ज (ppb) ने वाढून 1897 पीपीबीवर पोहोचली. आर्क्टिक आणि अंटार्क्टिकाभोवतीचा समुद्री बर्फ हा पृथ्वीच्या हवामानाच्या स्थिरतेचा एक आवश्यक सूचक आहे. सलग दुसऱ्या वर्षी विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.

Protected Content