पुण्यात मराठी विश्व साहित्य संमेलनाचे आयोजन

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठी विश्व साहित्य संमेलन ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालच्या मैदानात होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संमेलनाला उपस्थित राहणार असून यंदापासून मराठी साहित्यात जागतिकस्तरावर योगदान देणारे साहित्यिक, लेखक मधु मंगेश कर्णिक आणि मराठीतून करिअरला सुरुवात करणारे अभिनेता रितेश देशमुख यांचा सत्कार केला जाणार आहे, अशी माहिती उद्योग आणि भाषा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सामंत म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. ही गौरवाची बाब असून परदेशात राहणा-या मराठी साहित्यिकांना विश्व संमेलनात आमंत्रित करण्यात येणार असून त्यांचा खर्च सरकार करणार आहे. शिवाय मराठी साहित्यातील ज्येष्ठ आणि तरुण लेखक, कवींचा यामध्ये सन्मान करण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी व्यासपीठ मिळवून देण्यात येणार आहे. मराठी भाषेचा जतन, संवर्धन आणि विस्तार करण्यासाठी जे जे करता येईल, त्या सर्व गोष्टी सरकारकडून केले जातील. बालसाहित्यिकांपासून लोकसाहित्यिक यांना आमंत्रण देण्यात येणार आहे. विश्व मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार असल्यामुळे या संमेलनाला महत्त्व आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून, त्यानंतर सर्वत्र प्रमाण मराठी भाषेचा आग्रह धरला जात आहे. मात्र, शिवसेनेचे (उबाठा) संजय राऊत, भाजपचे मंत्री नितेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाशिव खोत यांना मराठी भाषा कशी बोलली पाहिजे, या परिसंवादात निमंत्रित करणार आहात का, त्यावर सामंत म्हणाले, तुम्ही ज्यांची नावे घेत आहात, त्यांना मराठी भाषा कशी बोलू नये, अशा परिसंवादात बोलवावे लागेल, असा नाव न घेता टोला लगावला. राज्यातील विद्यापीठे आणि शिक्षण विभागातील परिपत्रके हे इंग्रजीमध्ये येत आहेत. त्यामुळे मराठी भाषेचे संवर्धन कसे होईल, असा प्रश्न सामंत यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, राज्यातील सर्व विद्यापीठे, शिक्षण आणि इतर सर्व विभागांना आपले परिपत्रक हे मराठीत काढले जावेत, यासाठी सूचना दिल्या जातील.

Protected Content