जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी २०२४ या प्रकाशन वर्षासाठी देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या पुरस्कारांसाठी अर्ज १ जानेवारी, २०२५ ते ३१ जानेवारी, २०२५ दरम्यान पाठवता येतील. अर्ज महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, प्रभादेवी, मुंबई ४०००२५ येथे किंवा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेत सादर करता येतील.
या पुरस्कारासाठी पात्र ठरणारे पुस्तके १ जानेवारी, २०२४ ते ३१ डिसेंबर, २०२४ या कालावधीत प्रकाशित केलेली प्रथम आवृत्ती पुस्तके असतील. इच्छूक लेखक व प्रकाशकांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज व पुस्तके दाखल करणे आवश्यक आहे.
अर्ज पूर्णपणे भरून आवश्यक साहित्यासह ३१ जानेवारी २०२५ पर्यंत पाठवावेत. अर्जाच्या लिफाफ्यावर ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार २०२४ साठी प्रवेशिका’ असा उल्लेख करणे आवश्यक आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२५ असल्याचे सांगण्यात आले आहे.