जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । निर्भिड, निपक्षपाती पत्रकारिता करत समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जामनेर येथील पत्रकार नितीन इंगळे यांना राज्यस्तरीय ‘पत्रकार रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान त्यांना मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून मलकापूर येथे हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने ६ जानेवारी रोजी आयोजित भव्य गौरव सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमात पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, उद्योजक, प्रतिष्ठित नागरिक, आणि ज्येष्ठ पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार नितीन इंगळे यांना गौरवचिन्ह, मानपत्र, आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
नितीन इंगळे यांनी निर्भीड पत्रकारिता करत सामाजिक प्रश्न उघडकीस आणले असून शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी जनतेपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. स्वच्छता अभियान, विकास योजना आणि जनजागृतीवर आधारित त्यांच्या लेखनामुळे समाजातील सकारात्मक बदलांना चालना मिळाली आहे.
सन्मान सोहळ्याला जामनेर येथील पत्रकार सुनील इंगळे, सागर लव्हाळे, मोहन दुबे, मनोज महाले, शांताराम झाल्टे, अरुण तायडे, देविदास विसपुते, साहेबराव क्षीरसागर, मोहन जोशी, अनिल शिरसाट,किरण चौधरी, अक्षय वानखेडे आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित पत्रकारांनी नितीन इंगळे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हिंदी मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी हा सोहळा अत्यंत यशस्वीरीत्या पार पाडला. या कार्यक्रमाने पत्रकार बांधवांचे मनोबल उंचावले असून, त्यांच्या योगदानाला प्रोत्साहन दिले आहे.