जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकीचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून सिंधी कॉलनी चौकात दोन गटांमध्ये बुधवारी सायंकाळी ६ वाजता तुफान दगडफेकीची घटना घडली. भर बाजारपेठेत झालेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे दगडफेक करणारे जमाव पसार झाले आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
सिंधी कॉलनी हा जळगावमधील अत्यंत व्यस्त बाजारपेठेचा भाग असून दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ असते. बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून काही तरुणांमध्ये किरकोळ वाद झाला. हा वाद हाणामारीत परिवर्तित झाला, ज्यामुळे दोन्ही गटांनी आपापल्या साथीदारांना बोलावले. जमा झालेल्या दोन्ही गटातील जमावाने एकमेकांवर दगडफेक केली.
घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र भर गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. बाजारपेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने व्यापारी वर्गासह स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हापेठ पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवले. पळून जाणाऱ्या काही तरुणांचा पाठलाग करत पोलिसांनी एका तरुणाची दुचाकी जप्त केली असून ती पोलीस ठाण्यात आणली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.