धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील सैलानी बाबा मंदिराजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीच्या धडकेत अमळनेर येथील ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत वृद्धाचे नाव सुभाष शेनपुडू पाटील (वय ६०, रा. अमळनेर) असे आहे. सुभाष पाटील हे रविवारी ५ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता सोनवद गावाहून धरणगाव येथे येत असताना, सैलानी बाबा मंदिराजवळ दुचाकी क्रमांक ( एमएच १९ डीके ६१५६) ने त्यांना मागून धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर तातडीने त्यांना धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेबाबत ७ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता अज्ञात दुचाकीचालकाविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र भालेराव करीत आहेत.