फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या शेती रस्त्यांशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी आ. अमोल जावळे यांनी फैजपूर येथे पाणंद रस्ते योजनेसंदर्भात सर्व विभागांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी २०२२ पासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांबद्दल नाराजी व्यक्त केली आणि तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय
शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मातोश्री पाणंद रस्ते योजनेचे अनेक प्रकल्प अपूर्ण असल्याचे लक्षात घेऊन, योजनेला मिशन मोडमध्ये राबवण्याची गरज असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले. महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि कृषी विभागांसह इतर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत सहभाग घेतला.
२६ जानेवारीपर्यंत ठराव सादर करण्याचे निर्देश
शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी ग्रामसभांमध्ये रस्त्यांसाठीच्या ठरावांना मंजुरी देण्याचे निर्देश देताना, आमदारांनी २६ जानेवारीची अंतिम मुदत दिली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे सूचना जारी केल्या आहेत.
प्रशासनाला समन्वय साधण्याचा आग्रह
शेतकऱ्यांच्या रस्त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सर्व विभागांनी एकत्र येऊन काम करण्याचा सल्ला दिला. प्रलंबित कामांना गती देण्यासाठी अधिकाऱ्यांनी गंभीरपणे लक्ष घालावे आणि वेळेत रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, अश्या सुचना त्यांनी दिल्यात.
अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि पुढील दिशा
प्रांताधिकारी बबनराव काकडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अर्चना मोरे, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, तहसीलदार बंडू कापसे, गटविकास अधिकारी श्री. वानखेडे आणि इतर अधिकारी बैठकीला उपस्थित होते. बैठकीदरम्यान, शासकीय अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी पुढील कार्यवाही ठरवण्यात आली. आ. जावळे यांच्या या ठोस भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्या शेती रस्त्यांच्या समस्यांवर लवकरच सकारात्मक तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त होत आहे.