जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात असलेल्या नवल नेत्रज्योती हॉस्पिटल जवळ बनावट देशी विदेशी दारू तयार करून विक्री करणाऱ्या एका संशयिताला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी ५ जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजता कारवाई करत अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे ४० हजार ८५५ रूपये किंमतीच्या बनावट देशी व विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पहाटे ५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र वैद्यनाथ भाट वय-५५, रा.सिंधी कॉलनी परिसर, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरामधील नवल नेत्रज्योती हॉस्पिटल परिसरामध्ये संशयित आरोपी जितेंद्र भाट हा बनावट देशी विदेशी दारू तयार करून विक्री करत असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, राजेंद्र उगले, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राजेश मेढे, विजय पाटील, हरिलाल पाटील, प्रमोद ठाकूर आणि महिला पोलीस कर्मचारी रूपाली खरे या पथकाने रविवारी ५ जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजता छापा टाकला. यावेळी संशयित आरोपी जितेंद्र भाट यांच्याजवळ मोठ्या प्रमाणावर बनावट देशी व विदेशी दारूचा साठा मिळून आला. या कारवाईत पोलीसांनी ४० हजार ८५५ किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या संदर्भात पहाटे ५ वाजता पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जितेंद्र वैद्यनाथ भाट वय-५५, रा. सिंधी कॉलनी परिसर, जळगाव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले हे करीत आहे. न्यायालयाने संशयित आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.