नववर्षात किमान शंभर पुस्तके वाचण्याचा संकल्प करावा- डॉ. सुरवाडे

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अवघ्या विश्वात अशी असंख्य उदाहरणे मिळतील की, ज्यांनी-ज्यांनी पुस्तकांवर प्रेम केले, अफाट वाचन केले त्यांना हवे ते यश साध्य झाले असून विद्यार्थीदशेतूनच पुस्तके वाचण्याचा संकल्प करून आयुष्याला समृद्ध करावे असा सल्ला उपप्राचार्य प्रा डॉ मनोहर सुरवाडे यांनी दिला.

ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या ग्रंथालय व मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र शासन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत वाचन पंधरवाडा च्या कार्यक्रमात बोलत होते.

याप्रसंगी ग्रंथालय विभागाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र ठाकरे, ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा आय जी गायकवाड, प्रा उमाकांत पाटील, प्रा शरद बिऱ्हाडे, राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत, प्रा डॉ योगेश तायडे यांच्यासहित प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा आय जी गायकवाड यांनी केले. त्यात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची जिज्ञासा जागृत होण्याच्या हेतूने द बुक इज ब्लाइंड या नावाने पुस्तकांना कव्हर करून त्यावर स्कॅनर लावलेला आहे. विद्यार्थ्यांनी गुगल लेन्सच्या माध्यमातून स्कॅनर स्कॅन करून पुस्तकाची प्राथमिक माहिती प्राप्त करावी. नंतर सखोल पुस्तक वाचन करून त्या पुस्तकावर अभिप्राय द्यावा अशा अर्थाची संकल्पना मांडली.

या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जास्त जास्त वाचनाकडे वळावे. जेणेकरून ज्यांचं वाचन प्रगल्भ आहे त्यांना भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सहज सामोरे जाता येईल असे मनोगत व्यक्त केले. यासोबत दिनांक 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 या पंधरवड्यात ग्रंथ प्रदर्शन, वाचन कौशल्य कार्यशाळा, सामूहिक वाचन, लेखक आपल्या भेटीला, ग्रंथ कथन व ग्रंथ परीक्षण स्पर्धा असे विविध उपक्रम आयोजित केले जाणार असून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.

यानंतर ग्रंथालय समितीचे समन्वयक प्रा डॉ राजेंद्र ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले की, आमच्या पिढीतील प्राध्यापकांनी पुस्तकांवर प्रेम केले. स्वतःच्या गृहात ग्रंथालय उभारले म्हणून आम्ही आयुष्यातील आव्हाने सहज पेलू शकलोत. आता आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुस्तकांशी मैत्री करावी. जेणेकरून ज्याचं मस्तक पुस्तकात झुकते तो जगात कोणासमोरही नतमस्तक होत नाही म्हणून वाचाल तरच वाचाल असा मोलाचा सल्ला दिला. यावेळी उपप्राचार्य प्रा डॉ मनोहर सुरवाडे यांच्या शुभहस्ते कै धनाजी नाना चौधरी यांच्या प्रतिमेला माल्यारपण करण्यात आले व उपस्थित विद्यार्थ्यांना एक एक पुस्तके देऊन, वाचनानंतर अभिप्राय नोंदवण्यास सांगितले गेले.

या उपक्रमामुळे पुस्तकांशी मैत्री होऊन नवे विश्व आमच्यासमोर खुले होणार असल्याचा आनंद विद्यार्थ्यांनी बोलून दाखवला. या स्तुत्य उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे यांनी आयोजकांचे अभिनंदन व कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय विभागातील सहर्ष चौधरी, यामिनी पाटील, सुरेखा सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content