मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील विद्यार्थांसाठी वाचनविषयक उपक्रमांची आधीच गर्दी असताना आता शासनाने नववर्षापासून आणखी एका उपक्रमाला हात घालण्याचे ठरवले आहे. १ ते १५ जानेवारी या कालावधीमध्ये विद्यापीठे, महाविद्यालय व सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबवण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांचे वाचनाचे प्रमाण कमी होत चालले आहे. ‘नॅशनल अचिव्हमेंट सर्वे २०२१’च्या अहवालानुसार तिसरीच्या ३० टक्केपेक्षा जास्त मुलांना वाचताच येत नाही. पाचवीच्या ४१ टक्के मुलांना मजकूर योग्य पद्धतीने वाचता आला नाही. यामुळे वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन सरसावले असून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. दिवंगत राष्टपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम जयंतीदिनी ‘वाचन प्रेरणा दिन’ हा उपक्रम राबवला जातो. शिवाय, साप्ताहिक दोन वाचन तासिका, गोष्टींचा शनिवार, आनंदाचा तास याच्या जोडीने डिजिटल साधनांच्या वापरास प्रोत्साहन, ‘रिड इंडिया सेलिब्रेशन’ उपक्रम, ग्रंथोत्सव -पुस्तकाचे प्रदर्शन, शाळांमध्ये पुस्तकांची उपलब्धता असे उपक्रमही वर्षभर राबवले जात असतात.
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात शासनाने राज्यातील सर्व शाळांमध्ये वाचन चळवळ वाढवण्याचा निर्णय घेतला होता. ‘महाराष्ट्रातील वाचन चळवळ’ हा उपक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. आठवीपर्यंतच्या मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी व आनंददायी वाचनातून ‘शिकण्यासाठी वाचू शकेल’ अशी चळवळ युनिसेफ, प्रथम बुक्स, रिड इंडिया यांच्यासह शालेय शिक्षण विभागाकरवी राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शिवाय, विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये काही उपक्रम राबवले जातात.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जानेवारीत पंधरवडाभर सर्व विद्यापीठे, महाविद्यालय व सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अंतर्गत अभिनव उपक्रम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये सामूहिक वाचन, वाचनकौशल्य, कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथा स्पर्धा आदी उपक्रमांचा समावेश आहे. याकरिता राज्यस्तरीय, विभागीयस्तरीय, जिल्हास्तरीय व महाविद्यालयीनस्तरीय समितीची रचना कशी असावी याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.