सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आदिवासी भागातील वंचितांना स्वविकासातून समाजउत्थानाच्या प्रवाहात आणून देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद होईल अशा पहिल्या 1936 च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या ग्रामीण अधिवेशनाच्या आयोजनाची धुरा ज्यांनी समर्थपणे पार पाडली ते थोर स्वातंत्र्य सेनानी कै धनाजी नाना चौधरी हेच सद्यस्थितीत समाजासमोर आदर्शवत आहेत असे अभिवादन पर गौरवोद्गार डॉ दीपक सूर्यवंशी यांनी मांडले. ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सण आणि उत्सव समितीच्या वतीने आयोजित कै धनाजी नाना चौधरी यांच्या पुण्यतिथीच्या औचित्याने आयोजित अभिवादन सभेत बोलत होते.
यात सर्वप्रथम तापी परिसर विद्या मंडळाचे चेअरमन श्री लीलाधर विश्वनाथ चौधरी यांच्या शुभहस्ते कै धनाजी नाना चौधरी यांच्या अर्धपुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. यासोबत संस्थेचे सचिव प्रा मुरलीधर तोताराम फिरके, नियामक मंडळ सदस्य माजी प्राचार्य डॉ जी पी पाटील, माजी प्राचार्य डॉ व्ही आर पाटील, प्राचार्य डॉ आर एल चौधरी, प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे यांच्यासहित उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी धनाजी नाना चौधरी यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देऊन सद्यस्थितीत समाजासमोर समर्पित वृत्तीने कार्य करणाऱ्या दातृत्वांचा आदर्श असावा असा सूर मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले.