सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास विभागातर्फे आज १७ डिसेंबर ‘युवतिसभा’ अंतर्गत आयोजित पाच दिवसीय “मिशन साहसी अभियान” राबविण्यात येत आहे.
आज दुसऱ्या दिवशी ‘महिला आरोग्य व उपाय’ या विषयावर विशेष मार्गदर्शन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यात प्रमुख वक्त्या म्हणून भुसावळ येथील सेवानिवृत्त प्राध्यापिका डॉ. राजश्री नेमाडे यांचे मार्गदर्शन लाभले, त्यांनी महिलांनी आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले त्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व पटवून दिले, तसेच दर दोन महिलांच्या मागे एक महिला अशक्त आहे, अनेक महिलांना कर्करोग, पाळीचे आजार, हिमोग्लोबिनची कमतरता, आणि मेनोपॉज सारख्या आजारांना तोंड देत आहेत.
या सगळ्या वर उपाय म्हणजे योग्य आहार, व्यायाम आणि आरोग्यदायी व्यवस्थित दिनचर्या, याचबरोबर महिलांनी आर्थिक स्वावलंबी व्हावे म्हणून शिक्षण घेतले पाहिजे, आपल्यातील कौशल्य ओळखून तशा प्रकारचा व्यवसाय केला पाहिजे. आपली आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असेही सांगितले तसेच समाजात कुटुंबात महिलेसोबत होणारे अनेक अत्याचार स्त्रीभ्रूणहत्या, शारीरिक मानसिक छळ, बलात्कार या सगळ्यांचा बिमोड करण्यासाठी महिलांनी शारीरिक दृष्ट्या ही सक्षम झाले पाहिजे असाही संदेश आपल्या भाषणातून त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.कल्पना पाटील होत्या, त्यांच्यासोबत मंचावर विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय सोनजे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. जयश्री पाटील, सहायक अधिकारी प्रा.अचल भोगे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सविता वाघमारे यांनी विशेष योगदान दिले. तसेच डॉ. सरला तडवी, डॉ. सीमा बारी, डॉ. पल्लवी भंगाळे, प्रा. नाहीदा कुरेशी, प्रा. आदिती डाके, प्रा. हेमलता पाटील, प्रा. चैताली पाटील आणि प्रा. प्रिया बारी यांनी ही मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजल वायकोळे व आभार जान्हवी जंगले या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.