सोलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ईव्हीएम वादाच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीत गेले होते. या गावात ईव्हीएम विरोधात एक मॉक-पोल आयोजित केली होती. त्यामध्ये लोकांना बॅलेटच्या माध्यमातून मतदान करायचे होते. याच्या माध्यमातून त्यांना दाखवायचे होते की, शरद पवार गटाच्या उमेदवाराला ईव्हीएमच्या माध्यमातून मिळालेल्या मतांहून अधिक मते मिळू शकतात. मात्र पोलिसांनी ग्रामस्थांना रोखले होते आणि अनेक लोकांवर गुन्हे दाखल केले होते.
शरद पवार आज मारकडवाडी गावाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी म्हटले की, गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाहत आहे की, मारकडवाडीची चर्चा संसदेपर्यंत गेले आहे. जी गोष्ट देशातील कोणाला समजली नाही ती मारकडवाडीतील लोकांना समजली. निवडणुकीत वाद होतात मात्र इतका नाही. शरद पवारांनी अमेरिका व ब्रिटन या विकसित देशांचे उदाहरण दिले व म्हटले की, या देशातही बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान घेतले जाते.ईव्हीएम बाबत लोकांच्याच मनात शंका आल्याने आता निवडणूक आयोगाने निवडणूक पद्धतीत बदल केला पाहिजे,असं मोठं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे.
मारकडवाडीतील लोकांना उद्देशून शरद पवार म्हणाले,मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही संपूर्ण देशाला जागं केलं. मागील दोन चार दिवसांपासून आम्ही बघतोय. संसदेत विविध राज्यांचे खासदार आम्हाला भेटतात. ते दुसरं काहीच चर्चा करत नाहीत. ते तुमच्या गावची चर्चा करतात आणि विचारतात,हे गाव कुठं आहे?
शरद पवार म्हणाले, निवडणूक म्हटले की, कधी विजय होतो, कधी पराभव होतो, काही तक्रारी येतात. संबंध देशाला निवडणुकीबाबत आस्था असताना, त्यांच्या मनात शंका का येईल? पण आता लोकांच्या मनात शंका आलीय. याचा अर्थ निवडणूक पद्धतीत काहीतरी गडबड झाली आहे. ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला लागलीय. आता असे निकाल लागले ज्यामुळे तुमच्या मनात शंका आली, एकट्या तुमच्या नव्हे तर राज्यातील अनेक लोकांच्या मनात अशी शंका आली. लोक अस्वस्थ झाले.