अधिकृत माहिती नाही म्हणून ईव्हीएमवर शंका नाही : शरद पवार

कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर फारसे सार्वजनिक मंचावर न दिसलेले शरद पवार आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. आज कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. तसेच उद्या मारकडवाडी येथे जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले. “निवडणुकीत यश मिळाल्यानंतर एक उत्साहाचे वातावरण असते. पण मला महाराष्ट्रात तसे वातावरण दिसत नाही. पण मी उगीचच आरोप करणार नाही. कारण माझ्याकडे अधिकृत माहिती नाही. आम्ही फक्त मतदानाची आकडेवारी गोळा केली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला एकंदर किती मते मिळाली आणि त्यांचे किती लोक निवडून आले”, असे सांगून शरद पवारांनी विधानसभेच्या निकालाचे विश्लेषण केले.

शरद पवार पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाला ८० लाख मते पडली आणि त्यांचे फक्त १६ आमदार निवडून आले. तर शिवसेना शिंदे गटाला ७९ लाख मते मिळाली आहेत, त्यांचे ५७ आमदार निवडून आले आहेत. म्हणजे एक लाख कमी मतदान मिळूनही काँग्रेसपेक्षा ४१ आमदार अधिक निवडून आले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मते ७२ लाख आहेत. पण आमदार निवडून आले फक्त १० आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ५८ लाख मतदान मिळाले, पण त्यांचे ४१ आमदार निवडून आले आहेत.”

शरद पवार म्हणाले, “आकडेवारीतून काही गोष्ट दिसत असल्या तरी आमच्याकडे अधिकृत अशी काही माहिती नाही. त्यामुळे मी आज तरी ईव्हीएमवर शंका घेत नाही. हे फक्त मतांचे आकडे असून ते आश्चर्यकारक आहेत. विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले. तिथे सत्ताधारी आमच्यावर टीका करत होते. ‘लोकसभेला ईव्हीएमची तक्रार नव्हती, आताच ईव्हीएमविरोधात तक्रार का करता?’ असा युक्तीवाद सत्ताधारी करत असल्याचे मी ऐकले. पण मागच्या दोन महिन्यात चार निवडणुका झाल्या. त्यावरून सांगतो, हरियाणामध्ये भाजपाची अवस्था अतिशय वाईट होती, पण तिथे त्यांचा विजय झाला. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला फारसे यश मिळाले नाही, तिथे नॅशनल कॉन्फरन्सला यश मिळाले. महाराष्ट्रात भाजपाचा विजय झाला आणि आमचा पराभव झाला. पण त्याचवेळेला झारखंडमध्ये त्यांचा पराभव झाला. या चारही राज्याच्या निकालावरून सत्ताधारी हे म्हणू शकतात की, दोन निवडणुकीत एका ठिकाणी तुम्ही जिंकलात आणि दुसरीकडे आम्ही जिंकलो. त्यामुळे ईव्हीएमचा काही संबंध नाही. पण त्यातून असे दिसते की, मोठ्या राज्यात भाजपाचा विजय झाला आहे, तर छोटी राज्ये विरोधकांकडे गेली आहेत, असेही शरद पवार म्हणाले.

Protected Content