मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागला. त्यात भाजप, शिवसेना, व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला २३० जागा मिळाल्या. म्हणजे बहुमतासाठी आवश्यक असलेल्या १४५ च्या जादुई आकड्याहून ८५ जास्त जागा. पण आता निकाल लागून ९ दिवस झाले असून देखील महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही आहे. त्यामुळे भाजपने राज्यात दोन निरिक्षकांची नियुक्ती केली आहे. भाजपने अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या दोघांच्या उपस्थितीतच महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला आपणच मुख्यमंत्रीपदी हवे असल्याचे ठणकावून सांगितले आहे. ते इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, ‘मी सर्वसामान्यांसाठी काम करतो. मी जनतेचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मीच व्हावे अशी जनतेची इच्छा आहे.’ एकनाथ शिंदे यांनी आजच्या आपल्या सर्वच बैठका रद्द केल्या आहेत. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहे. त्यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीसही दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 30 नोव्हेंबर रोजी नागपुरात सांगितले होते की, नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. पंतप्रधान मोदी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.