जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव भुसावळ रोडवरील दूरदर्शन टॉवरच्या शेजारी वडताल संस्थेच्या अंतर्गत भगवान स्वामीनारायण मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. या मंदिरात भव्य मूर्तींची प्राणप्रतिष्ठा स्थापन करण्यासाठी या परिसरात 10 ते 17 डिसेंबरच्या दरम्यान भव्य प्राणप्रतिष्ठान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्वामीनारायण मंदिर येथी विश्वस्त नयनस्वामी महाराज यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलताना दिली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासूनची उत्सुकता लागून असलेल्या भगवान श्री स्वामीनारायण मंदिराचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. या मंदिरात भगवान स्वामीनारायण यांच्यासह इतर मुर्त्यांची प्राणप्रतिष्ठा स्थापन करण्यासाठी 10 ते 17 डिसेंबर दरम्यान मूर्ती प्राणप्रतिष्ठान महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. यामध्ये १० डिसेंबर रोजी दिंडी सोहळाचे आयोजन करण्यात आले असून कालिंका माता मंदिरापासून ते थेट स्वामीनारायण मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी सकाळी श्री महाविष्णू याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर भगवान कथा देखील होणार आहे. दरम्यान या महोत्सवाच्या कालावधीमध्ये आलेल्या सर्व भाविकांसाठी वैद्यकीय शिबिराचे आयोजन देखील केलेले आहे. तसेच ११ डिसेंबर रोजी रात्री ८ ते १० वाजेच्या दरम्यान मंदिरातील वेगवेगळ्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पण सोहळा होणार आहे. याच दिवशी ५४ फुटी उभारण्यात आलेल्या बजरंग बली यांच्या मूर्तीचे देखील लोकार्पण होणार आहे. १३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता या मंदिराचे शुभारंभ होणार असून त्या ठिकाणी आकर्षक असलेल्या २०२ वर्षांपूर्वीचे मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यासाठी वडताल संस्थेचे सहकार्य लाभत आहे.
यामध्ये राधाकृष्ण देव, द्वारकाधीश, बद्रीनाथ, जगन्नाथपूरी, रामेश्वर, जळगावाचे दैवत प्रभू श्रीरामचंद्र आणि महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री विठ्ठल यांचे दरबार स्थापनेसह इतर देवांचे मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. या मंदिरात जुन्या पद्धतीचे नक्षीकाम करण्यात आलेले असून यात विशेष थ्रीडी नक्षीकाम करण्यात आलेले आहे. दरम्यान, ५ डिसेंबर रोजी भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या महोत्सवासाठी विदेशातील भाविकांसह महाराष्ट्र, गुजरात राज्यातून भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभणार आहे. दरम्यान या प्राणप्रतिष्ठान सोहळ्यासाठी भगवान स्वामीनारायण यांचे आठवे वंशज यांच्याहस्ते या प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमात या महोत्सवात उपस्थिती द्यावी, असे आवाहन मंदिराचे विश्वस्थ नयनस्वामी महाराज यांनी केलेले आहे.