आळंदीत संजीवन समाधी सोहळ्यात संत मुक्ताबाईंच्या पादुकांचे स्वागत

आळंदी-वृत्तसेवा । संतश्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराजांचा 728 वा संजीवन समाधी सोहळा श्रीक्षेत्र आळंदीत मोठ्या भक्तिभावाने आणि परंपरेच्या उत्साहात साजरा झाला. देशभरातून आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस्थळावर भक्तिरसपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

परंपरेप्रमाणे संत मुक्ताबाईंचे समाधी मंदिर मुक्ताईनगर येथून पादुकांचे आळंदीत आगमन व स्वागत सोहळा विशेष उत्साहात पार पडला. श्री संत मुक्ताई मठ, गोपाळपुरा आळंदी येथे दर वर्षीच्या परंपरेनुसार अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला, काल्याचे कीर्तन ह भ प संदीप महाराज खामणीकर यांनी केले.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याचे निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आळंदी येथे श्री संत नामदेव महाराजांचे १६वे वंशज ह भ प केशवदास नामदास महाराज यांचे किर्तन झाले, त्यांनी केलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी चे वर्णन म्हणजे प्रत्यक्ष समाधी चा क्षण अनुभवल्याची भावना सर्व वारकरी भाविकांना आली, त्या नंतर श्री क्षेत्र पंढरपूर येथून साक्षात पांडूरंग परमेश्वर यांच्या पादुका व श्री संत मुक्ताईंच्या पादूका यांची ज्ञाोबाराय यांच्या समाधी भेटीने वारकरी भारावून गेले, श्री संत ज्ञानेश्वर महाराज व लाडकी बहीण मुक्ताबाई यांच्या भेटीच्या पवित्र क्षणाने वारकरी भक्तांच्या अंत:करणात भक्तिरस अधिक जागृत झाला.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांच्या हस्ते श्री संत मुक्ताई संस्थान मुक्ताईनगरच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये संस्थानचे अध्यक्ष ॲड.रवींद्र भैय्या पाटील, विश्वस्त संदीप दादा पाटील, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रवींद्र हरणे महाराज, ह.भ.प. उद्धव महाराज, ह.भ.प. संदीप महाराज खामनिकर, ह भ प विनायक महाराज हरणे, ह भ प गजानन महाराज लाहुडकर ह.भ.प. पंकज महाराज, ह भ प सागर महाराज लाहूडकर,, पांडुरंग पाटील आणि छबिलदास पाटील यांचा समावेश होता.

आध्यात्मिक समन्वयाचे प्रतीक
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत मुक्ताबाई यांच्या विचारांचा आणि परंपरांचा समन्वय वारकरी संप्रदायाने आजही टिकवून ठेवला आहे. हा समन्वय जपत तरुण पिढीला भक्ती, समर्पण आणि सेवाभावाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

वारकऱ्यांचे माघारी प्रस्थान
संजीवन समाधी सोहळ्याच्या समारोपानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या गाभाऱ्यात बंधुराज आणि पांडुरंग परमात्म्याच्या साक्षीने भक्तिभावाने भक्तांचा निरोप घेण्यात आला. वारकऱ्यांनी समाधानी मनाने माघारी प्रस्थान केले.

सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक भक्ताला ज्ञानेश्वर महाराज आणि संत मुक्ताबाईंच्या कृपेचा लाभ होवो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Protected Content