जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ३० हजारांची लाच स्विकारणाऱ्या राज्य उत्पादक शुल्क भुसावळ विभागाचे उपनिरीक्षक राजकिरण सोनवणे यांच्यासह एकावर फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात संशयित आरोपी राजकिरण सोनवणे हे फरार असल्याने भुसावळ न्यायालयाच्या मान्यतेने शुक्रवारी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता सोनवणे यांच्या घराची झडतीत लाचलुचपत विभागाने तब्बल ४० लाख ९८ हजार ४४ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. अशी माहिती जळगाव लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक योगेश ठाकूर यांनी सायंकाळी ६ वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकातून कळविले आहे.
असे आहे प्रकरण :
भुसावळ येथील राज्य उत्पादक विभागाने केलेल्या कारवाईत दारूच्या बाटल्या पकडून कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ३० हजारांची लाच मागणाऱ्या राज्य उत्पादन भुसावळ विभागाचे उपनिरीक्षक राजकिरण सोनवणे आणि खासगी व्यक्ती किरण माधव सुर्यवंशी यांच्यावर २३ नोव्हेंबर रोजी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक राजकिरण सोनवणे हे फरार झाले होते.
न्यायालयाच्या परवानगीने घराची झडती
त्यानुसार लाचलुचपत विभागाने विशेष न्यायालय भुसावळ यांच्या परवानगीने सर्च वॉरंटच्या माध्यमातून शुक्रवारी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता दोन पंच, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी तसेच व्हिडिओग्राफर कॅमेराजसह संशयित आरोपी राजकिरण सोनवणे यांच्या घराची झडती घेतली.
घरात आढळला ४१ लाखांचा मुद्देमाल :
या झडतीत सोनवणे यांच्या घरातून १ लाख ४९ हजार २९० रुपयांच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, अडीच हजार रूपये किंतीची २५ लिटर गावठी हातभट्टीची दारू, बुलेट मोटरसायकल, कारचे पेपर्स, दीड लाखांचे सोन्या चांदीचे दागिने, पिस्तूलाच्या १० रिकाम्या पुंगळ्या, १ लाख ९१ हजार रुपयांची रोकड, तसेच १७ लाख ९० हजार रुपयांचे सोने-चांदी खरेदी केलेल्या मूळ पावत्या आणि टीव्ही फ्रिज एसी व इतर साहित्य असा एकूण ४० लाख ९८ हजार ४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे भुसावळ विभागात मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई नाशिक येथील लाच लुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिला घागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे, अशी माहिती जळगाव येथील लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी शुक्रवारी २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.