सेवानिवृत्त वृद्धाची 19 लाखांची ऑनलाईन फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल

भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ शहरातील तापी नगरात राहणाऱ्या एका 65 वर्षीय वृद्धाला बँकेचे व्यवहार घरपोच करून देऊन चांगले रिटर्न मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 19 लाख 405 रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रदीपसिंह प्रतापसिंह परदेशी वय-65 रा. तापी नगर, भुसावळ हे वृद्ध आपल्या परिवारासह वास्तव्याला असून ते सेवानिवृत्त आहेत. 10 मार्च 2023 ते 6 डिसेंबर 2023 च्या दरम्यानच्या काळात जळगाव येथे राहणारे संदीप चौधरी व सोनाली चौधरी यांनी प्रदीपसिंह परदेशी यांना बँकेचे व्यवहार घरपोच करून देऊन चांगले रिटर्न मिळवून देऊ असे सांगून विश्वास संपादन करून त्यांच्याकडून कॅश, ऑनलाईन व चेकद्वारे तब्बल १९ लाख ४०५ रुपये स्वीकारून त्याच्या मोबदल्यात बनावट व हुबेहूब दिसणारे कागदपत्र तयार करून त्यांच्या घरी आणून अपहार केला. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रदीपसिंह परदेशी यांनी सोमवारी 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी संदीप चौधरी व सोनाली चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पीएसआय विजय गायकवाड हे करीत आहे.

Protected Content