मुक्ताईनगर मतदार संघात आ. चंद्रकांत पाटील यांना आघाडी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी टपाली मतदानात आघाडी घेतली आहे.

जळगाव जिल्हाच नव्हे तर राज्यातील सर्वात वलयांकीत मतदारसंघ म्हणून मुक्ताईनगरकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांना अटीतटीच्या सामन्यात पराभूत केल्यानंतर ते शिवसेनेत आणि नंतर शिंदे गटात सहभागी झाले होते. त्यांना यंदा पुन्हा एकदा रोहिणी खडसे यांनी आव्हान दिले. चंद्रकांत पाटील हे शिवसेनेच्या तिकिटावर महायुतीचे उमेदवार म्हणून तर रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तिकिटावर महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या होत्या. यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी दिली होती. तर मोठे शासकीय कंत्राटदार म्हणून ख्यात असलेले विनोद सोनवणे यांनी देखील अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उडी घेतली होती. परिणामी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत झाली.

प्रचाराच्या आधीच मुख्यमंत्री हे आ. चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मुक्ताईनगरात येऊन गेले. तर नंतर अभिनेता गोविंदा यांचा रोड शो देखील गाजला. तर रोहिणी खडसे यांच्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतली तर खा. अमोल कोल्हे यांनी रोड शो केला. यासोबत चारही उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात प्रचार फेऱ्या काढून मतदारांना आवाहन केले. यामुळे यंदाची निवडणूक मोठ्या चुरशीची होऊन सर्वांचे लक्ष मतमोजणी कडे लागले.

या पार्श्वभूमिवर, आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू करण्यात आली. यात प्रारंभी टपालाने करण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने शासकीय अधिकारी व कर्मचारी, दिव्यांग, वयोवृध्द आदींनी केलेल्या मतदानाचा समावेश होता. या टपाली मतदानाच्या पहिल्या फेरीत आमदार चंद्रकांत पाटील यांना ५८१२ तर रोहिणी खडसे यांना ३०५१ इतकी मते मिळाली. यात चंद्रकांत पाटील यांना लीड मिळाल्याचे अधोरेखीत झाले आहे. तर, आता मतमोजणी यंत्रांची मतमोजणी होणार आहे. याचे अपडेट आम्ही आपल्याला देणार आहोत.

Protected Content