पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विधानसभेची सर्वत्र धामधूम असतांनाच शहरातुन अवैधरित्या देशी दारु घेवून जाणारे चारचाकी वाहनातुन देशी दारुचे ५० खोके पोलिसांनी जप्त करत मोठी कारवाई केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तर दुसरीकडे पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक पवार, पोहेकॉ राहुल शिंपी, पोकॉ रणजीत पाटील हे शहरातील जारगाव चौफुली ते जळगाव चौफुली येथे गस्तीवर असताना भारत डेअरी स्टॉप ते जळगाव चौफुली दरम्यान एक मारुती सुझुकी वाहन क्रं. (एमएच ३० पी १८१३) या चारचाकी वाहनात हिरव्या कापडाने काहीतरी झाकलेले गस्तीवर असलेल्या पथकाच्या लक्षात येताच तात्काळ व्हॅव थांबवून वाहन चालकाची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. दरम्यान व्हॅनची झडती घेतली असता त्यात १ लाख ४० हजार रुपये किंमतीचे ५० खोके त्यात एका खोक्यात १८० एम. एल. च्या ४८ देशी दारुच्या बाटल्या आढळुन आल्या. पथकाने ७० हजार रुपये किंमतीची मारुती सुझुकी व्हॅन व देशी दारुचे खोके जप्त करत व्हॅन चालक सुशिल कानडे (वय – ४२) रा. मानसिंगका नगर, पाचोरा यास ताब्यात घेतले. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी हे करीत आहे.
सलग तीन दिवस ड्राय डे असल्याने होतेय दारुची चोरटी वाहतुक
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आदर्श आचारसंहिता लागू असतांनाच पाचोरा शहरात अवैधरित्या देशी दारु वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी पकडले आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपासून सलग तीन दिवस ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. या काळात मद्यपींची गैरसोय होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या देशी, विदेशी दारुची साठवणुक करुन मोठ्या दराने दारु विक्री करण्याचा उद्देश काही लोकांनी सुरु केला आहे.