लाचखोर वायरमनला एसीबीचा शॉक; २० हजार घेतांना रंगहात पकडले !

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वीजपुरवठ्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिरसोली युनिटचे वायरमन विक्रांत अनिल पाटील उर्फ देसले (३८, रा. मावली नगर, जळगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता अजिंठा चौफुली परिसरात करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील संभाजीनगर परिसरातील तक्रारदारांच्या घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी नवीन खांब टाकण्यात आले होते. त्या खांबावरून वीजपुरवठा मिळण्यासाठी तक्रारदार शिरसोली येथील महावितरण कार्यालयात वेळोवेळी गेले असता वायरमन विक्रांत पाटील याने सदरचे काम करून देण्यासाठी ३० रुपये लाचेची मागणी केली होती. यापैकी १० हजार रुपये या अगोदर घेतले होते. मात्र तरीदेखील वीजपुरवठा मिळत नव्हता. त्यासाठी उर्वरीत २० हजार रुपयांची मागणी होत असल्याने या विषयी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १८ ऑक्टोबर रोजी तक्रार दिली होती. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता अजिंठा चौफुली परिसरातील एका हॉटेलबाहेर पाटील याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोलिस नाईक किशोर महाजन, पोकॉ राकेश दुसाने यांनी केली.

Protected Content