जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असतांनाच येत्या आठवड्यात मोठ्या नेत्यांच्या सभा होणार असल्याचे नियोजन सत्ताधारी आणि विरोधकांच्या वतीने करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
यंदाच्या प्रचार सुरू झाल्यानंतर रोहित पवार, बाळासाहेब थोरात आदींचा अपवाद वगळता कोणत्याही मोठ्या नेत्याच्या सभा झालेल्या नाहीत. आता प्रचार हा निर्णायक टप्प्यात येऊन पोहचला असल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातुन मोठे नेते सभा घेण्याची शक्यता आहे.
महायुतीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची सभा फैजपूर येथे होऊ शकते. अद्याप यावर शिक्कामोर्तब झाले नसले तरी याचे नियोजन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धरणगाव, पाचोरा, पारोळा आणि मुक्ताईनगर येथे सभा घेऊ शकतात. या संदर्भात देखील पक्षाच्या वतीने अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तर महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार, उध्दव ठाकरे, जयंत पाटील आदींसह अन्य नेत्यांच्या सभा जिल्ह्यात होऊ शकतात. विशेष करून पवार यांची सभा ही जामनेर, धरणगाव व पारोळा येथे होण्याची शक्यता आहे. काँग्रेसतर्फे आधीच बाळासाहेब थोरात यांची सभा झाली असली तरी राहूल गांधी यांच्यासह राज्यातील अन्य नेते देखील सभा घेण्याची शक्यता आहे. तसेच अनिल पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सभा होऊ शकतात.
मान्यवर नेत्यांच्या सोबतील विविध राजकीय पक्षांच्या वतीने पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी यांच्या सभा होण्याचे देखील नियोजन आहे. यामुळे पुढील आठवडा हा खऱ्या अर्थाने सभांनी गाजणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.