मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्ष आपले जाहीरनामे प्रसिध्द करत आहेत, त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा आज जाहीरनामा प्रसिध्द करण्यात येत आहे. यामध्ये सर्वांत महत्त्वाची घोषणा ‘लाडकी बहीण’ विषयी करण्यात आली आहे.
लाडक्या बहिणींसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणा-या रकमेत वाढ करण्यात येईल असे म्हटले गेले आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे १५०० वरून २१०० रुपये करणार असल्याचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटले गेले आहे.
जाहीरनामा प्रसिध्द करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, महायुती सरकार काळात जे काम केले ते लोकांपर्यंत घेऊन चाललो आहोत. आम्ही काही बदल करणा-या योजना मागच्या ४ महिन्यांत केल्या आहेत. लाडकी बहीण योजना, आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणासाठी पैसे अशा अनेक योजना जाहीर केल्या. याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे. तालुका स्तरीय देखील जाहीरनामा प्रसिद्ध करत आहोत.
स्थानिक पातळीवरील जाहीरनामा यामध्ये आमदारांचे काम मांडलेले असेल. आम्ही सुरू केलेल्या हेल्पलाईनला २५ लाख कॉल आले आहेत. आता आम्ही टोल फ्री नंबर सुरू करत आहोत. ९८ ६१ ७१ ७१७१ हा टोल फ्री नंबर सुरू केला आहे. यावर तालुका स्तरीय जाहीरनामा ऐकता येणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या पैशात वाढ करत आहोत. ती आम्ही २१०० रुपये करणार आहोत. २ कोटी ३० लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
अजित पवारांच्या जाहीरनाम्यातील मुद्दे खालीलप्रमाणे आहे.
१. लाडकी बहीण योजना १५०० रुपयांवरून २१००रुपये करण्यात येणार.
२. महिला सुरक्षेसाठी पोलिस दलात २५००० महिलांची भरती
३. धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये देण्याचे आश्वासन
४. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न
५. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन.
६. शेतकऱ्यांच्या पिकांच्या एमएसपीमध्ये २० टक्के वाढ करण्याचे आश्वासन
७. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ४५००० जोड रस्ते जोडण्याचे आश्वासन.
८. वृद्धापकाळ निवृत्ती वेतन १५०० वरून २१०० पर्यंत वाढवण्याचे आश्वासन
९. वीज बिलात ३०% कपात करण्याचे आश्वासन.
१0 .सौरऊर्जेला प्राधान्य देण्याचे आश्वासन
११. १० लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी १००००हजार शिष्यवृत्ती देण्याचे आश्वासन
१२. राज्यात २५ लाख रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन