जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या ४० नेत्यांवर कारवाई करण्यात आली असली तरी जळगाव जिल्ह्यातील दोघांना अभय देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये बंडाळी उफाळून आली आहे. याला भारतीय जनता पक्ष देखील अपवाद नाही. या पक्षाच्या अनेक उमेदवारांनी बंड करत उमेदवारी केल्यामुळे महायुतीचे उमेदवार धोक्यात आलेले आहेत. अशाच राज्यभरातील ४० उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. पक्षाने आज या उमेदवारांची हकालपट्टी केली आहे. यात जळगावचे माजी उपमहापौर डॉ. अश्वीन सोनवणे तसेच माजी नगरसेवक मयूर कापसे यांचा देखील समावेश आहे. या दोन्ही मान्यवरांनी जळगावातून अपक्ष उमेदवारी केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने ४० बंडखोरांवर कारवाई केली असली तरी देखील पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांच्यावर कारवाई टाळली आहे. यातील शिंदे हे पाचोऱ्यातून तर पाटील हे एरंडोल मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करत आहेत. या दोन्ही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रिंगणात आहेत. अमोल शिंदे यांनी गेल्या वेळेस उमेदवारी केली असता त्यांचा निससटा पराभव झाला होता. तेव्हा देखील त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती. यंदा देखील त्यांना पक्ष त्यांच्या पाठीशी अप्रत्यक्ष उभा असल्याचे दिसून आले आहे. तर एरंडोल-पारोळा मतदारसंघातून माजी खासदार ए. टी. नाना पाटील हे अपक्ष उमेदवारी करत असले तरी देखील त्यांच्यावर देखील कारवाई टाळण्यात आली आहे. अर्थात, दोघांवर कारवाई करतांना दोघांना यातून वगळण्यात आल्याने राजकीय वर्त्ुाळात चर्चेला उधाण आले आहे.