कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणुकीच्या आता मोजकेच दिवस राहिले आहे. अशातच आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी काँग्रेसचा हात सोडला आहे. त्यांनी थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. जयश्री जाधव या काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी आहेत. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर जयश्री जाधव यांनी पोटनिवडणुक लढत विजय मिळवला होता. मात्र आताच्या निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे नाराज झालेल्या जयश्री जाधव यांनी थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
विधानसभेसाठी काँग्रेसकडून या मतदार संघातून राजेश लाटकर, जयश्री जाधव, मधुरिमाराजे हे इच्छुक होते. सुरुवातीला काँग्रेसने राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये नाराजीचा सुरू उमटला. काँग्रेसला उमेदवार बदलावा लागला. त्यांच्या जागी माजी आमदार मालोजीराजे यांच्या पत्नी मधुरिमाराजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांना उमेदवारी दिल्याने जयश्री जाधव या नाराज झाल्या. त्यांनी काँग्रेसकडे आपली नाराजी व्यक्त करत थेट पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. जयश्री जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. जयश्री जाधव या मुळच्या शिवसैनिक आहेत. त्यामुळे कोल्हापुरात काँग्रेस मोठा झटका बसला आहे.