जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या अर्जांची छाननी झाल्यानंतर आता बंडखोर तसेच आपल्याला त्रासदायक ठरण्याची शक्यता असलेल्यांच्या माघारीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभेच्या जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर काल छाननी पूर्ण झाली. यात काही अपवाद वगळता बहुतांश उमेदवारांचे अ र्ज हे वैध ठरले आहेत. यात लहास-सहान पक्षांसह बहुतेक अपक्षांचा समावेश आहे. छाननी झाल्यानंतर आता दिनांक ४ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. या कालावधीत कुणीही आपला अर्ज मागे घेऊ शकतो.
दरम्यान, प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची उदंड गर्दी झाली असली तरी आता यात आपल्याला त्रासदायक ठरू शकणाऱ्या उमेदवाराने माघार घ्यावी यासाठी त्यांची मनधरणी सुरू झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी पडद्याआड मोठ्या घडामोडी घडतांना दिसून येत आहेत. यात मोठा आर्थिक व्यवहार वा तडजोडी होत असल्याची चर्चा असली तरी वरून सारे काही शब्दाखातर होत असल्याचे दाखविण्यात येईल असेही दिसून येत आहे. अर्थात, आता पुढील चार दिवस हे उमेदवारांच्या मनधरणीचे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.