मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. २८८ मतदारसंघात तब्बल ७९९५ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. उद्या या अर्जांची छाननी होणार असून, चार तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. शेवटच्या दिवशी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री नवाब मलिक, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्यासह अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. महाविकास आघाडी व महायुतीतील सर्वच पक्षात अनेक ठिकाणी बंडखोरी झाली असून, पुढील दोन, तीन दिवस बंडोबांना थंड करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. याबरोबरच आघाडीतील घटकपक्षांनी पाच ठिकाणी परस्परांविरुद्ध उमेदवार उभे केले आहेत, तर महायुतीत तीन, चार ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. २८८ मतदारसंघात एकूण ७९९५ उमेदवारांचे १०९०५ अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती रात्री उशिरा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. उद्या ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल व ४ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. शेवटच्या दिवशी काही दिग्गज नेत्यांसह अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. २०१९ च्या निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना यावेळी पक्षाने उमेदवारी दिली आहे. आज त्यांनी कामठी मतदारसंघात अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साकोली विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. तर वरळी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात अर्ज दाखल केला.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शक्तिप्रदर्शन करत कामठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साकोलीतून अर्ज भरला. संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर पश्चिममधून, भाजपाच्या हेमंत रासने यांनी पुण्याच्या कसबा पेठ मतदारसंघातून, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनी वडगांव शेरीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे गोपाल अग्रवाल यांनी गोदिया विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. धुळे शहर मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल गोटे यांनी, तसंच एमआयएमचे फारुख शाह यांनी, काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी नागपूर पश्चिमधून, श्वेता महाले यांनी चिखलीतून, शिवसेनेचे दीपक केसरकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन तेली यांनी सावंतवाडी मतदारसंघातून अर्ज दाखल केला. बेलापूरमधून भाजपाच्या मंदा म्हात्रे, दिंडोशीतून संजय निरुपम, रत्नागिरी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळ माने, तासगाव-कवठे महांकाळमधून संजय पाटील, महाड मधून भरत गोगावले आणि नागपूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.