मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणूकीसाठी अनेक जागांवर उमेदवार बदलाच्या सत्रानंतर अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत संपल्यानंतर आता महायुती व महाविकास आघाडीचे फायनल जागावाटपाचे चित्र स्पष्ट झाले आहे. मविआने छोट्या मित्रपक्षांना ८ जागा सोडल्या असून राज्यातील सहा ठिकाणी मविआतील घटक पक्षांमध्येच सामना आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी संपली.
अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या दिवशीच्या अखेरच्या काही तासांपर्यंत महायुती व महाविकास आघाडीकडून उमेदवारी याद्या प्रसिद्ध करणे काही ठिकाणी उमेदवार बदलण्याचे काम सुरू होते. महाविकास विकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व उद्धव ठाकरे या प्रमुख तीन पक्षांच्या मिळून २८५ जागा होतात. यात ६ ठिकाणी दोन पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत. म्हणजे २८० जागांवर हे तीन पक्ष एकत्रितपणे लढणार आहेत. उर्वरित ८ जागा छोट्या मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत. यामध्ये काँग्रेस १०२, शिवसेना उबाठा ९६, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ८६, समाजवादी २, शेतकरी कामगार पक्ष २ जागांवर उमेदवार उभे केले आहे.