दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी २०२६ मध्ये ब्रिटनमधील ग्लासगो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून अनेक खेळ काढून टाकण्यात आले आहेत. ग्लासगोमध्ये एकूण 10 खेळांसाठीच खेळाडूंमध्ये स्पर्धा होणार आहे. हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट आणि नेमबाजी यासारखे प्रमुख खेळ ग्लासगो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा २०२६ मध्ये नसतील.
कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने मंगळवारी कार्यक्रम बजेट-अनुकूल ठेवण्यासाठी १० खेळांची यादी जाहीर केली. संपूर्ण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ग्लासगोमधील फक्त चार ठिकाणी आयोजित केली जाणार आहेत. २०२२ च्या बर्मिंगहॅम आवृत्तीच्या तुलनेत यावेळी एकूण ९ कमी खेळ असतील. २०१४ च्या आवृत्तीनंतर १२ वर्षांनंतर ग्लासगो राष्ट्रकुल खेळाचे आयोजन करणार आहे. मेगा-इव्हेंटची 23 वी आवृत्ती २३ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
यापूर्वी २०२२ मध्ये, २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये एकूण ७२ देशांनी भाग घेतला होता. त्या वर्षी, खेळाडूंनी १९ खेळांमध्ये २८३ पदकांसाठी स्पर्धा केली, ज्यामध्ये ४५०० हून अधिक खेळाडूंचा सहभाग होता. यामध्ये ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक १७८ पदके जिंकली असून त्यापैकी ५७ सुवर्णपदके आहेत. त्या वर्षी इंग्लंड दुसऱ्या, कॅनडा तिसऱ्या आणि भारत चौथ्या क्रमांकावर होता.