तापी नदी पात्रात उडी घेतलेल्या तरूणाचा मृतदेह आढळला

भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील तापी नदीच्या पुलावरून तरूणाने उडी घेतल्याची घटना गुरूवारी रात्री १२.३० वाजता घडली होती. अखेर शनिवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी शोध घेतल्यानंतर तरूणाचा मृतदेह जुगादेवी परिसरात तापी नदी पात्रात आढळून आला आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आविनाश राजू सोनवणे वय २४ रा. बांभोरी ता.धरणगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात अविनाश सोनवणे हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. गुरूवारी १७ ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० वाजता अविनाश याने भुसावळ शहराजवळील तापी नदीच्या पुलावरून नदीपात्रात उडी घेतली होती. उडी घेण्याचे कारण समोर आलेले नाही. त्यानंतर पोलीसांसह नगर पालिकेचे कर्मचारी यांनी मृतदेह शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर अखेर शनिवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता अविनाशचा मृतदेह जुगादेवी परिसरातील तापी नदीपात्रात आढळून आला. भुसावळ नगर पालिकेचे कर्मचारी यांनी मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इकबाल सैय्यद हे करीत आहे.

Protected Content