ब्रेकिंग : ॲड. सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक; १० ते १२ जण ताब्यात !

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील प्रताप नगर येथील एका धार्मिक स्थळाचे अतिक्रमण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काढण्याच्या कारणावरून शुक्रवारी १८ ऑक्टोबर रात्री ११ वाजता ॲड. सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी १० ते १२ जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्र उशिरा जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील प्रताप नगर परिसरात असलेल्या एका धार्मिक स्थळाचे अतिक्रमण असण्याच्या कारणावरून गेल्या अनेक वर्षांपासून तक्रार आहे. हे अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आल्याने ते काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यावरून काहीजण संतप्त झाले. त्यामुळे शुक्रवारी १८ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास  मोठा जमाव प्रताप नगर परिसरातील धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जमला व अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शविण्यात आला. त्यानंतर जमावाने धार्मिक स्थळापासून जवळच असलेल्या ॲड. सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेथून १० ते १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते. ॲड. सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक करीत असताना जमावाने जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे मोठा गोंधळ उडाला.

Protected Content