ब्रेकिंग : कारागृहातील बंद्याला पोलिसांकडून बेदम मारहाण व जिवेठार मारण्याची धमकी; जळगावातील प्रकार

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव कारागृहात आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देतो त्या मोबादल्यात पैसे द्या असे म्हणत खूनाच्या गुन्ह्यात संशयीत असलेल्या ज्ञानेश्वर अभिमान पाटील (वय ५५, रा. वाघळी, ता. चाळीसगाव) या बंद्याला कारागृह पोलिसांनी बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी १५ ऑक्टोंबर जिल्हा कारागृहात घडली होती, मात्र त्या बंद्याला मारहाणीमुळे रक्ताची लघवी होवून श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला गुरुवारी १७ ऑक्टोंबर रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच मारहाणीची वाच्यता केल्यास जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप बंदीचा मुलगा राहुल पाटील याने केला.

चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील ज्ञानेश्वर पाटील हे खूनाच्या गुन्ह्यात गेल्या आठ महिन्यांपासून जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. कारागृहातील ९ नंबरच्या बॅरेकमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. दरम्यान, कारागृहातील हिवरकर नामक कर्मचारी हा ज्ञानेश्वर पाटील यांना आम्ही तुम्हाला जेलमध्ये प्रोटेक्शन देतो, त्या मोबदल्यात आम्हाला पैसे द्या असे म्हणत तो पैशांची मागणी करीत होता. मात्र ज्ञानेश्वर पाटील यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिल्याने मंगळवार १५ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२.३० ते दीड वाजेच्या सुमारास हिवकर नामक कर्मचाऱ्याने त्यांना बॅरेकमधून बाहेर काढत तुम्हाला साहेबांनी बोलवले असल्याचे सांगून तो त्यांना घेवून गेला.  त्यानंतर इतर सहकाऱ्यांच्या मदतीने ज्ञानेश्वर पाटील यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत ज्ञानेश्वर पाटील हे गंभीर जखमी होवून त्यांच्या पाठीवर मारहाणीच्या खूणा दिसून येत होत्या. दरम्यान, गुरुवारी १७ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास गंभीर जखमी झालेले ज्ञानेश्वर पाटील यांना अचानक श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागला, तसेच त्यांना रक्ताची देखील लघवी झाल्यानंतर त्यांना कारागृह कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान त्यांच्या मुलगा राहूल पाटील यांनी मारहाण करणाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून आम्हाला न्याय देण्याची मागणी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना केली आहे.

 

Protected Content