केंद्राचा मोठा निर्णय ! शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्र सरकारच्या कोट्यवधी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एनडीए सरकारने दिवाळीच्या आधी मोठी भेट दिली आहे. सरकारने महागाई भत्ता आणि महागाई भत्तामध्ये ३ टक्के वाढ जाहीर केली आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए आता ५३ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.

महागाई भत्त्याची वाढ १ जुलै २०२४ पासून लागू होणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा डीए त्यांच्या मूळ वेतनाच्या आधारे ठरवला जातो. सध्या २५ हजार रुपये इतकं मूळ वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्याचा आताचा डीए १२५०० रुपये आहे. नव्या निर्णयामुळं ५३ टक्क्याच्या हिशेबानं तो १३,२५० रुपये होणार आहे. वाढीव ३ टक्क्यानुसार ही वाढ महिन्याला ७५० रुपये असेल.

महागाई भत्ता वाढीचा निर्णय जुलै २०२४ पासून पूर्वलक्ष्यीप्रभावानं लागू होणार आहे. त्यामुळं जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांची डीएची थकबाकी (७५०+७५०+७५०) २२५० रुपये होते. या सर्वांची भर ऑक्टोबरच्या पगारात पडणार आहे. मूळ वेतन २५ हजार रुपये असलेल्या कर्मचाऱ्याचा पगार बेसिक सॅलरी, डीए आणि घरभाडे भत्ता म्हणजेच एचआरए जोडून ५०,००० हजार रुपये येत असे. ऑक्टोबर महिन्यापासून तो ५०७५० रुपये असेल. केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए देते, तर पेन्शनधारकांना डीआर दिले जाते. सर्वसाधारणपणे डीए आणि डीआरमध्ये वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये वाढ केली जाते. सध्या केंद्र सरकारच्या एक कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना ५० टक्के महागाई भत्ता मिळतो.

याआधी मार्च महिन्यात सरकारनं महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती. २००६ मध्ये केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीए आणि डीआर गणनेच्या फॉर्म्युल्यात बदल केला. ३० सप्टेंबर रोजी कॉन्फेडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉइज अँड वर्कर्सनं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून महागाई भत्त्या/डीआर वाढीची घोषणा करण्यास होत असलेल्या दिरंगाईबद्दल चिंता व्यक्त केली होती.

Protected Content