वृक्ष लागवड योजनेचा वर्क कोड बजेट नुसार करावा – शेतकरी नेते सुनील देवरे

पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा-नरेगा अंतर्गत सामाजिक वनीकरण, पंचायत समिती, वनविभाग या सर्व तालुका स्तरावरील विभागाअंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर व शेतामध्ये विविध वृक्ष लागवडी संदर्भात योजना आहे. त्यानुसार महाराष्ट्रसह भारतातील विविध राज्यांनी या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देत आहेत.परंतु या योजनेच्या लाभाकरिता मनरेगा नवी दिल्ली अर्थात ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून एकंदरीत पाच लाखाच्या वरती वर्क कोड जनरेट करण्यात येणार नाही न सांगता वेबसाईटवर सेटिंग करून असा कठोर निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांनी थेट भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या नरेगा योजनेच्या संचालक माननीय अदिती सिंग मॅडम यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

सविस्तर वृत्त असे की संबंधित विभागांतर्गत महाराष्ट्रातून वृक्ष लागवड योजने मधून शेतकरी लाभ घेताना दिसत आहे या योजनेचा फायदा म्हणजे निसर्गाचा समतोल राखण्यास व शेतकऱ्यांच्या जिवनात अमुलाग्र बदल तसेच गावातील मजुरांना काम मिळण्यासाठी शेतात व बांधावर साग, शेवगा इत्यादी वृक्षांची लागवड करण्याकरिता इच्छुक असून त्या संदर्भातील एकंदरीत प्रत्येक विभागाकडे शेतकऱ्यांच्या शेकडोंनी फायली पेंडिंग पडलेल्या आहेत परंतु केंद्र शासनाचा चुकीच्या निर्णयामुळे शेतकरी या योजनेपासून वंचित होताना दिसत आहेत. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने एक हेक्टर शेतामध्ये तीन वर्षाकरिता सदर वृक्षाची लागवड केली असता त्याला शासकीय नियमानुसार अंदाजे 15 ते 20 लाखाचे अंदाजपत्रक तयार होते.आणि त्यानुसार त्याला सदर अनुदान व त्या गावातील मजुरांना त्या क्षेत्रामध्ये काम दिले जाते परंतु नरेगा ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून सदर अंदाजपत्रकानुसार सदर अनुदान न देता वेबसाईटवर जास्तीत जास्त पाच लाखापर्यंतच वर्ककोड जनरेट करण्यात येत आहे असा चुकीचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंची नुकसान होताना दिसून येत आहे. म्हणून शेतकरी नेते सुनील देवरे यांनी याकडे विशेष लक्ष देत सरळ दिल्ली गाठत नरेगाच्या संचालक यांना निवेदन दिले.

त्यानुसार झालेल्या चर्चेअंती संचालक माननीय अदिती सिंग यांनी श्री देवरे यांना लवकरच आम्ही राज्यांचे प्रतिनिधी यांना बोलून यासंदर्भात वर्क कोड अंदाज पत्रकानुसार तयार करण्याच्या विषयावर सविस्तर चर्चा करून मार्ग काढू असे सांगितले सोबतच नरेगा अंतर्गत एकूण २६६ योजना असून त्या सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असेही आव्हान केले. त्यावर शेतकरी नेते यांनी सांगितले की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सदर योजना संजीवनी असून त्याकडे आपण विशेष लक्ष द्यावे जेणेकरून शेतकऱ्यांचे आर्थिक सामाजिक उन्नती होण्यास मदत होईल त्यामुळे आपण याकडे सकारात्मकता दाखवावी अशी विनंती केली यावेळी शेतकरी नेते सुनील देवरे पारोळा कार्याध्यक्ष गुलाब पाटील व विनोद पाटील हे उपस्थित होते.

Protected Content