जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पुरुषोत्तम उर्फ प्रशांत विलास पाटील (वय १५, रा. जलाराम नगर, सावखेडा शिवार) याच्या खूनप्रकरणी महिलेचा प्रियकर प्रमोद जयदेव शिंपी (वय-३८, रा. विखरण, ता. एरंडोल) याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर पुराव्याअभावी मुलाची आई मंगलाबाई विलास पाटील (वय ३५) हिची निर्दोष मुक्तता करण्यात आली. असा निकाल शनिवारी २८ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता जळगाव जिल्हा न्यायालयाने दिला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सावखेडा शहरातील जलाराम नगरात राहणाऱ्या मंगलाबाई पाटील व प्रमोद शिंपी यांच्यातील अनैतिक संबंधाची कुणकुण मंगलाबाईचा मुलगा पुरुषोत्तम याला लागल्याने त्याने आईला हा प्रकार बंद करायला सांगितला, मात्र प्रेमात आकंठ बुडालेल्या मंगलाबाई व प्रमोद यांनी पुरुषोत्तमच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करुन त्याचाच काटा काढण्याचा कट रचला होता. त्यानुसार १६ जानेवारी २०२२ रोजी रावेर येथे कबुतर ठेवण्याचा पिंजरा घ्यायला जायचे सांगून दोघांनी त्याला मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरच्या जंगलात नेले. बऱ्हाणपूर तालुक्यातील आसीरगड येथील जंगलात नेऊन तेथे गळफास देऊन ठार मारले व झाडाला मृतदेह लटकवून दोघं जण परत आले होते. दुसऱ्या दिवशी मुलगा सापडत नसल्याने वडील विलास नामदेव पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली होती. तपासात धागेदोरे प्रमोद शिंपीपर्यंत पोहचले व पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खाकीचा हिसका दाखविला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती. त्यानुसार त्याच्यासह मंगलाबाईला अटक केले होते. तेव्हापासून शिंपी हा कोठडीत होता तर मंगलाबाई जामीनावर होती.
हा खटला न्या. एस.एन. राजूरकर यांच्या न्यायालयात चालला. खटल्यादरम्यान एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. यात प्रमोद शिंपी याचा मित्र, तपासाधिकारी, जळगावचे कोतवाल, मोबाईल सीडीआरसाठी विषयी तांत्रिक माहिती देणारे व इतरांची साक्ष महत्त्वाची ठरली.
या प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. मात्र गुन्ह्याच्या निकालामध्ये परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे ठरले. ते ग्राह्य धरून न्या. एस.एन. राजूरकर यांनी प्रमोद शिंपी याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर पुराव्याअभावी मयत मुलाची आई मंगलाबाई हिची निर्दोष मुक्तता करण्यात आली.