विद्यापीठात एमकेसीएल सोबत सामंजस्य करार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल), पुणे यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या कराराद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या उद्दीष्टांना अनुसरून, ‘विशारद’ कौशल्यविकास केंद्राच्या माध्यमातून एमकेसीएलच्या आयलाईक कोर्सेसची अंमलबजावणी संलग्नीत महाविद्यालये/संस्था व विद्यापीठातील प्रशाळांमध्ये होणार आहे. हे अभ्यासक्रम पदवी व पदव्युत्तर पातळीवरील सर्व शाखांतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणार आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० अंतर्गत विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण देणे आणि रोजगारक्षम बनविणे महत्वाचे उद्दिष्ट आहे. या पाश्वभूमीवर एमकेसीएलचे २०४ क्रेडिट आधारीत अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आधुनिक आणि उद्योग-समर्पित कौशल्ये शिकवतील. हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक प्रमाणपत्र नव्हे तर कौशल्य-समृध्द करिअर तयार करण्यातही मदत करतील.जेणेकरून रोजगाराच्या उत्तम संधी प्राप्त होतील.

कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कराराप्रसंगी कुलसचिव डॉ. विनोद पाटील, विशारद समन्वयक व व्यवस्थापन शास्त्र प्रशाळेच्या संचालक प्रा. मधुलिका सोनवणे, एमकेसीएल वरीष्ठ समन्वयक रेवती नामजोशी, वरीष्ठ व्यवस्थापक अमित रानडे, समन्वयक प्रतिनिधी कविता बिरारी, क्षेत्रीय व्यवस्थापक निलेश तावर आणि अथर्व बिरारी उपस्थित होते.

हे अभ्यासक्रम नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण आणि क्रेडीट आधारीत सर्टीफिकेशन प्रदान करून त्यांचे रोजगार क्षमतेचे प्रमाण वाढवतील. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ अकादमिक शिक्षण नव्हे तर प्रत्यक्ष उद्योग आणि तंत्रज्ञानाच्या बदलांशी संबंधित कौशल्य मिळवून भविष्यातील करीअरसाठी प्रगल्भता मिळणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध ‘विशारद स्कील डेव्हलपमेंट सेंटर’ टॅबवर जाऊन नोंदणी करावी.

Protected Content