जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित ललित कला संवर्धिनीच्या माध्यमातून भुलाबाई महोत्सव या नृत्यगीतांची स्पर्धा गेल्या बावीस वर्षांपासून आयोजित करण्यात येत आहे. यंदा या महोत्सवाचे २३ वे वर्ष साजरे होत आहे. कान्हदेशातील लोकसंस्कृतीमध्ये भुलाबाईला अनन्य साधारण महत्व आहे. महिलांच्या आत्मीयतेचा आणि सर्वात प्रिय असलेला हा सोहळा रविवार दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे सकाळी १० ते ६ या वेळात आयोजित करण्यात आला आहे. ही स्पर्धा यंदा शहरी व ग्रामीण स्तरावर व तीन गटात होत असून प्रत्येक गटात १२ ते १५ मुलींची संख्या असते. यात भुलाबाईच्या गाण्यांना अग्रक्रम देण्यात येतो मात्र सध्याच्या चालू घडामोडींवर समाजोपयोगी संदेशाची पेरणी महिला करतात. अशा गाण्यांना प्राधान्य देवून भुलाबाई महोत्सव हा समाजप्रबोधनाचे एक व्यासपीठ म्हणून प्रस्थापित करण्यात प्रतिष्ठानला यश प्राप्त झाले आहे. भुलाबाईची महती अधिक महिलांपर्यंत पोहचणे व ग्रामीण भागातील महिलांना सहभागी होता यावे या दृष्टिने यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील चोपडा, जामनेर, अमळनेर, पारोळा, चाळीसगाव व भुसावळ येथे तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये विजयी संघ यामध्ये जिल्हा स्तरीय सहभागी होतील.
भुलोजी आणि भुलाबाईला साक्षात शंकर आणि पार्वतीचे रूप मानून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. यानिमित्ताने सायंकाळी मुली एकत्रित येवून भुलाबाईचे गाणे गात घरोघरी हिंडायच्या यातून एकमेकींचे नाते आणि एकोपा वाढण्यास मदत होत असे तर भुलाबाईच्या गाण्यातून एक सशक्त, सुसंस्कृत परिवाराची जडण घडण करण्यात महिलांना बळ मिळत होते. परंतु आधुनिक युगात हा संवाद लोप पावत आहे आणि या लोकपरंपरेस उतरती कळा लागली आहे. अशा स्त्री केंद्रित उत्सवाचे महत्व जाणून केशवस्मृतीच्या पुढाकारातून भूलाबाई महोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. या निमित्ताने शाळा महाविद्यालय आणि खुल्या गटात सर्वांना भुलाबाईचे गीत व त्यावर नृत्य सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते. यात विजेत्यांच्या प्रत्येक गटास प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात येणार असून सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यंदाच्या भुलाबाई महोत्सव प्रमुख म्हणुन सौ. साधना दामले व सहप्रमुख म्हणून सौ. देवयानी कोल्हे यांची निवड झाली आहे.
भुलाबाई महोत्सवास प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वी मायादेवी मंदिर ते छ. संभाजीराजे नाट्यगृह पर्यंत भुलाबाईची पालखी काढण्यात येणार आहे. यामध्ये मुलींचे ढोल पथक, लेझिम पथक, सामाजिक समतेचे संदेश देणारे फलक असतील. जळगाव शहरात साजरा होणारा भुलाबाई महोत्सव हा अशा स्वरूपात महाराष्ट्रात कुठेही साजरा होत नाही. या निमित्ताने शाळा महाविद्यालय आणि खुल्या गटात सर्वांना भुलाबाईचे गीत व त्यावर नृत्य सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते. यात विजेत्यांना प्रत्येक गटास प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात येणार असून सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येते. स्पर्धेचे उदघाटन सकाळी १० वाजता होईल तर पारितोषिक वितरण सायंकाळी ५ वाजता खासदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत होईल. अधिकाअधिक महिलांनी व मुलीनी कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.