मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरनंतर त्याच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना फटकारले आहे. आरोपीने पोलीस अधिकाऱ्याकडून पिस्तूल हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला, यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने तपास योग्य पद्धतीने होत नसल्याचे निदर्शनास आल्यास योग्य तो आदेश देण्यास भाग पाडले जाईल, असेही स्पष्ट केले.
या याचिकेत अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी सांगितले की, या प्रकरणातील सहा आरोपी अद्यापही फरार आहेत आणि तेदेखील तितकेच जबाबदार आहेत. माझ्या मुलावर खोटे आरोप लावण्यात आले आणि तो राजकारणाचा बळी ठरला. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी सुरू आहे.
अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी या एन्काउंटरविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वकील अमित कटारनवरे यांनी अक्षयच्या वडिलांचं वकीलपत्र घेतलं आहे. हा एन्काउंटर फेक असल्याचा आरोप अक्षयच्या वकिलांकडून केला जात आहे. नजीकच्या काळात निवडणुका असल्याने हे सत्ताधाऱ्यांचा आदेशामुळे खून केल्याचा आरोप अक्षयच्या वडिलांच्या वकिलांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, अशा पद्धतीच्या घटनांमुळे आपण पोलिसांना या प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी पाठिंबा देतो, असा त्याचा अर्थ निघतो. मग कायदा आणि सुव्यवस्था कशासाठी आहे. देवाचा न्याय अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. अशा घटनांमुळे पोलिसांना प्रोत्साहन दिलं जात आहे. जे न्यायव्यवस्थेसाठी अत्यंत घातक आहे.