जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावसह धुळे जिल्ह्यातून दुचाकींची चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा तालुक्यातील कर्जाणा गावातून राविवारी ८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या एकुण सहा दुचाकी जप्त करण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश व रेड्डी यांनी सोमवारी ९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. दीपक सुमाऱ्या बारेला वय -२९ रा. कर्जाणा ता. चोपडा असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी संदीप पाटील आणि प्रवीण मांडोळे हे चोपडा तालुक्यात पेट्रोलिंग करत असताना त्यांना दीपक बारेला हा चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली. त्यांनी ही माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना दिली. त्यानुसार त्यांनी पथकातील संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, गोरख बागुल, राहुल बैसाणे, प्रमोद ठाकूर असे पथक रविवारी ८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता चोपडा तालुक्यातील कर्जाणा गावात रवाना केले. दरम्यान संशयित आरोपी हा त्याच्या गावात कर्जाळा येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापडा रचला आणि त्याला अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने पाचोरा, पारोळा आणि धुळे जिल्ह्यातील मोहाडी या ठिकाणाहून वेगवेगळ्या ६ दुचाकी चोरी केल्याचे कबुली दिली. पोलिसांनी चोरीच्या सहा दुचाकी जप्त केले असून पुढील कारवाईसाठी त्याला पाचोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.