Home क्राईम क्रेडीट कार्डवर ऑफर देण्याचे सांगून पावणे तीन लाखांची फसवणूक

क्रेडीट कार्डवर ऑफर देण्याचे सांगून पावणे तीन लाखांची फसवणूक


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एका खासगी बँकेच्या क्रेडीट कार्डवर ऑफर असल्याचे सांगून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा समोरील व्यक्तीने विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून २ लाख ७८ हजार रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक असे की, जळगाव शहरातील जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणाऱ्या जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी वास्तव्यास आहे. त्यांच्या मोबाईलवर दि. १५ ऑगस्ट रोजी एका अनोळखी व्यक्तीने संपर्क साधला. त्या वेळी त्यांना ‘तुम्ही कोणते क्रेडीट कार्ड वापरता ?’ अशी विचारणा केली. त्यानंतर एका खासगी बँकेच्या क्रेडीट कार्डची माहिती देत त्यावर चांगली ऑफर असल्याचे सांगितले. त्यावर विश्वास ठेवत दोन कार्ड वापरण्यापेक्षा एका नामांकीत कंपनीचे कार्ड मिळत असल्याने ते वापरू या विचाराने त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यानेही विश्वास ठेवला. संपर्क साधणाऱ्याने सेवानिवृत्तास लिंक पाठविण्यासह एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. ॲप डाऊनलोड केल्यानंतर ओटीपी व इतर कोणतीही माहिती दिली नाही तरी समोरील व्यक्तीला या निवृत्ताच्या मोबाईलमधील सर्व माहिती दिसू लागली. एकप्रकारे त्याने मोबाईलचा ताबा घेत निवृत्ताच्या खात्यातून दोन लाख ७८ हजार ८८५ रुपये काढून घेतले.हा प्रकार घडल्यानंतर सेवानिवृत्त कर्मचारी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound