जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दोन महिलांसह वृद्धाच्या अपघाती मृत्यूप्रकरणी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या दोन्ही ठेकेदारांविरुद्ध (झांडू व ॲग्रो इन्फ्रा) गुन्हा दाखल करण्याचा निर्णय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच शहराबाहेरुन जाणाऱ्या रस्त्याचे चौपदरीकरण मार्च २०२५ पूर्ण करण्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र संबंधित ठेकेदाराकडून घेण्याचा यावेळी निर्णय झाला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सा.बां.विभागाचे नवनाथ सोनवणे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी आमदार भोळेंनी वृद्धाच्या मृत्यूनंतर आंदोलन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यावर आक्षेप घेतला. प्रकल्प संचालक पवार यांची भूमिका चुकीची असल्याचे सांगत त्यांनी ठेकेदारांविरोधात सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली.
दरम्यान, पालकमंत्र्यांनी ठेकेदाराला ‘बायपास’च्या कामाविषयी विचारणा केली.तेव्हा मार्च २०२५ पर्यंत काम पूर्ण होईल, असे या ठेकेदाराने सांगितले. ‘यावेळी पालकमंत्र्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. ठेकेदाराने पहिल्यांदाच चेहरा दाखविल्याविषयी जाब विचारून ‘ त्यांच्या कामाविषयी असंतोष व्यक्त केला. काम लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश दिले.
मूळ ठेकेदारांपैकी एक जण या बैठकीला उपस्थित होता. ‘बायपास’चे काम तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी कल्याण येथील ठेकेदाराला सोबत घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तर शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम दोन ठेकेदारांकडे विभागाले गेल्याचे यावेळी सांगितले. यावेळी समितीने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
बायपास : मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्यासाठी अल्टीमेटम गतिरोधक : विद्यापीठ, जैन इरिगेशन, बांभोरी, खोटेनगर, शिवकॉलनी, आकाशवाणी, इच्छादेवी, अजिंठा चौफुली, कालिका माता मंदिर चौक या ९ ठिकाणी अत्याधुनिक व प्रभावी गतिरोधक उभारण्याची जबाबदारी ‘न्हाई’ची असेल.
जनजागृतीपत फलक : वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी फलक लावण्याची जबाबदारी आरटीओ विभागाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पार पाडली जाईल.
ठेकेदारांविरोधात कारवाई : दोन्ही महिलांसह वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी भा.दं.वि.३०४ (अ) कलमान्वये गुन्हा दाखल केला जाईल. त्यासाठी ‘न्हाई’कडून फिर्याद दिली जाईल.
आयटीआयसमोर मोरी : आयटीआयसमोरच्या रस्त्यावर सातत्याने खड्डे पडत आहेत. त्याठिकाणी मोरी बांधण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. खड्डे भरणार : रस्त्यावर रिफ्लेक्टर लावण्यासह खड्डे भरण्याची जबाबदारी ‘न्हाई’ची असेल. दरम्यान, या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे यांनी बांभोरी पुलाची स्थिती नाजूक झाली असल्याचा निष्कर्ष नोंदविला. वाहनांचा अवाजवी भार, अवैध रेतीचे उत्खनन मोठ्या प्रमाणावर झाल्याने या पुलाविषयी परिक्षण करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला.
वाहतूक पोलिसांसोबत ‘आरटीओ’ दरम्यान, शहरातील महामार्गावर असणाऱ्या धोकेदायक स्थळांवर वाहतूक पोलिसांच्या मदतीला आरटीओ विभागाने मानधन तत्वावर कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आकाशवाणी चौकात ‘सिग्नल’ दरम्यान, मनपाचे शहर अभियंता चंद्रकांत सोनगीरे यांनी दोन दिवसात आकाशवाणी चौकातील सिग्नल यंत्रणेसाठी निविदा काढली जाणार असल्याची माहिती यावेळी दिली. त्यानंतर अन्य चौकांसाठीही ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.
तरसोद, पाळधी सेवारस्त्याची दुरुस्ती जळगावकडून भुसावळकडे जाणारी वाहतूक तरसोदनजीक खोळंबते. याठिकाणी खोलवर असलेल्या रस्त्यामुळे अडचण होत असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. तिच स्थिती पाळधीनजीक असल्याचे सांगण्यात आले. या दोन्हीठिकाणी सिमेंटीकरणातून दुरुस्ती करण्याचे निर्देश ‘न्हाई’ला देण्यात आले आहेत.