कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कागलमध्ये भाजपचे मोठे नेते समरजितसिंह घाटगे यांनी आज ३ सप्टेंबर मंगळवार रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. घाटगे यांचा हा पक्ष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आहे. समरजितसिंह घाटगे यांच्या या पक्षप्रवेशामुळे कागल मतदारसंघातून त्यांना उमेदवारी निश्चित झाली असून आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे हसन मुश्रीफसोबत त्यांची लढत होईल. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित होते.
यावेळी बोलताना समरजितसिंह घाटगे म्हणाले, हा निर्णय घेत असताना माझ्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो. नेत्यांना सांगून करण्यासाठी धमक लागते. प्रेम केलं तर तन-मन-धन करून करायचं. इथून पुढे तुम्हाला त्रास होणार, सरकारी ताकद लावली जाईल, पण हा समरजित तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.
समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केल्याने शरद पवाराची ताकद कागलमध्ये वाढण्यास मदत होणार आहे. समरजितसिंह घाटगे यांचा पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात चांगला दबदबा आहे आणि त्यांचा चाहता वर्ग देखील मोठ्या प्रमाणात असल्याने कागल मतदारसंघातील विधानसभा निवडणूक चांगलीच रंगणार आहे.