मानमोडी येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अपात्र

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बोदवड तालुक्यातील मानमोडी येथील सरपंच, आणि एक ग्रामपंचायत सदस्याला अपात्र करण्याचा निर्णय आज जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, बोदवड तालुक्यातील मानमोडी येथील संजय सखाराम पाटील यांनी सरपंच सौ. पूनम मोहन पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य धनराज रामू भील यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. या दोन्ही जणांनी सरकारी मालकी असणाऱ्या जागेवर अतिक्रमण करून रहिवास केल्याचे दिसून आल्यामुळे सदर तक्रार दाखल करण्यात आली होती.
यात सरपंच पूनम पाटील या कुटुंबियांसह त्यांचे सासरे कै. भावलाल फकीरा पाटील यांनी ग्रामपंचायतीची मालकी असणाऱ्या जागेवर (मालमत्ता क्रमांक 288) जेथे अतिक्रमण केले होते तेथे शेती अवजारे, चारा ठेवण्यासाठी वापर करत असल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले होते. तर धनराज रामू भील यांनी शासकीय अनुदानातून बांधण्यात आलेल्या घरकुलात 10 चौरस फुट जास्तीचे बांधकाम करून, तसेच घरकुलाला लागून पत्र्याचे शेड तयार करून नियमांचा भंग केल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आलेले होते. तसेच या घरकुलात नियमानुसार शौचालय बांधण्यात आले नसून धनराज भील व त्यांचे कुटुंब हे उघड्यावर शौचास जात असल्याचे या तक्रार अर्जात नमूद करण्यात आलेले होते.

यावरील सुनावणीत सरपंच पूनम पाटील यांनी तक्रार अर्जातील जागेवर आपले चुलत सासरे यांचा रहिवास असून आपला याच्याशी संबंध नसल्याचे सांगितले. तर धनराज भील यांनी आपण नियमानुसार घरकुलाचे बांधकाम केले असून घराच्या बाजूला असलेले शेड हे आपल्या बहिणीचे असून याचा माझ्याशी काही संबंध नसल्याचा खुलासा केला होता. मात्र त्यांच्या वतीने करण्यात आलेले स्पष्टीकरण हे सुनावणीत अमान्य करण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणी झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निकाल दिला आहे. यात अर्जदार संजय सखाराम पाटील यांचा अर्ज ग्राह्य धरून मानमोडीच्या सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्या सौ. पूनम मोहन पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य धनराज रामू भील यांना अपात्र करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी तक्रारदार संजय सखाराम पाटील यांच्या वतीने ॲड. विश्वासराव भोसले यांनी काम पाहिले.

Protected Content